Thursday, May 3, 2018

स्वप्न झड़े फूल से, मीत चुभे शूल से




सभोवतालची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बिघडत असेल आणि नैतिक मुल्यांची अवनती होत असेल, तर महाविद्यालयीन युवकांचे कर्तव्य काय असावं ? आपले शिक्षण प्रथम व्यवस्थित पार करुन देशाचे सुशिक्षित नागरीक होऊन मग राजकारणात सक्रिय व्हावे की राष्ट्र उमारणीसाठी शिक्षणाला तिलांजली देवून राजकारणात यावं? 
प्रत्येक देशाभिमानी विद्यार्थी युवकाला भेडसावणाऱ्या या विषयाला हात घालणारा चित्रपट १९६५ साली प्रदर्शित झाला. नांव होतं " नयी उमर की नयी फसल". आर. चंद्रा दिग्दर्शित, या चित्रपटाची गीते कवी नीरज यांनी शब्दबद्ध केली असून या गीतांना रोशन यांच्या संगीताचा परीसस्पर्श लाभला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला ते साल होतं १९६५, म्हणजे देश स्वतंत्र होऊन तब्बल १७ वर्षे पूर्ण झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तत्कालीन तरूण आणि विद्यार्थी युवकाच्या ओठावर राष्ट्रगान होते. डोळ्यात स्वप्नांची इंद्रधनुष्ये आणि ऱ्हदयातील आकांक्षांना गवसणी घालायची आंस होती. हातांना कामाची अपेक्षा होती आणि आणि मनाला समृध्दीची प्रतिक्षा होती. 
पण जसजशी वर्षे पुढे सरकत गेली तशी या स्वप्नांच्या कळ्या झडून गेल्या. राजकारणात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. बेरोजगार तरूणांचे तांडे अस्वस्थ झाले आणि मग नाईलाजाने हिंसाचाराकडं वळले. त्यांना वाममार्गाला लावण्यासाठी बाहेरच्या अनिष्ट शक्ती तयार होत्याच... 
नयी उमर की नयी फसल या चित्रपटात अशाच राजीव नामक युवकाची आणि त्याच्या मित्रांची कथा सांगितली आहे. राजीव ( राजीव) हा एका महाविद्यालयात शिक्षण घेणारा तडफदार पण उतावीळ आणि भडक स्वभावाचा पण अंतर्यामी सृजनशील व कवी मनाचा युवक आहे. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची देशात चाललेली वाताहत पाहून तो व त्याचे काॅलेजमधील मित्र यांच्या मनात व्यवस्थेविषयी अंगार आहे. तशातच देशात निवडणुकीचे वारे वाहताहेत. राजीव व त्याचे मित्र शिक्षण सोडून राजकारणात सक्रिय होऊन देशातील ही विपरीत व्यवस्था आमुलाग्र बदलायच्या ध्यासाने झपाटून जातात. त्याची काॅलेजमधील प्रेयसी शैल (तनुजा) हीचा मात्र या साऱ्या गोष्टींना विरोध आहे. सरस्वतीच्या मंदिरात शक्तिची पूजा नको. तरूणाईने आधी आपलं शिक्षण पूर्ण करून, बौध्दिक दृष्ट्या प्रगल्भ होउन मग विधायक राजकारणात जाऊन हवी तर देशसेवा करावी असं तिचं मत आहे. देशभक्ती म्हणजे केवळ राजकारण नव्हे, इतरही अनेक विधायक मार्गांनी मातृभूमीचे ऋण उतरवता येतं पण त्यासाठी शुध्द चारित्र्य आणि प्रगाढ अभ्यासाची गरज आहे आणि हे सर्व शिक्षणानंच मिळतं म्हणून राजीवनं शिक्षणाकडं लक्ष द्यावं असं तिचं मत आहे. राजीवचा भाऊ आणि त्याची आई हे ही तिच्याशी सहमत आहेत. पण या सर्वांचा विरोध झुगारून राजीव आणि त्याचे मित्र राजकारणात शिरून एक पक्ष निर्माण करतात आणि निवडणूक लढवायचे ठरवतात. त्यांना फूस देण्यासाठी आणि या फुकट उपलब्ध असलेल्या युवाशक्तीचा आपल्या पक्षासाठी उपयोग करून घेण्यासाठी इतर पक्ष आणि धंदेवाईक प्रवृत्ती तयारच असतात. ते राजीवलाच निवडणूक लढण्यासाठी उद्युक्त करतात. निवडणूक म्हटले की पैसा आलाच. त्याची चणचण जाणवु लागताच राजीव आईने कष्टाने जमवलेले पैसे आणि दागिन्यांची चोरी करतो. निवडणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचारात राजीव आणि त्याचे मित्र जखमी होतात. कालेज प्रिंसीपल त्यांना रस्टिकेट करतात. या निर्णयामुळे चिडलेले ते संप करतात. या सर्व प्रकरणात राजीवला मनस्वी त्रास होतो. घरातली माणसं, आई आणि भाऊ दूरावतात व तो घर सोडतो. प्रेयसीही दुरावते. राजीवची आई राजीवने चोरी केली या धसक्याने आजारी पडून अंथरुणाला खिळते. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने शैलकडून पैसे घ्यायची नामुष्की घरावर येते. पैशापरी पैसा जातो, घर सोडायची पाळी येते, प्रिय माणसांची नाराजी व त्यांचा वियोग सहन करावा लागतो, काॅलेज मध्ये दुष्किर्ती होते. इतकं करून राजीवच्या हाती काय येतं तर निवडणुकीतील अपयशाचे दारूण प्राक्तन..!! सगळंच आयुष्य नासलेल्या दुधासारखं होतं. 
या विदारक परिस्थितीत होरपळून गेलेला आणि पश्चातापदग्ध झालेला राजीव या गीताद्वारे आपल्या विदग्ध मनातले विचार व्यक्त करतो.
स्वप्न झड़े फूल से, मीत चुभे शूल से 
लुट गये श्र्ऋंगार सभी, बाग के बबूल से 
और हम खड़े खड़े, बहार देखते रहे 
कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे …..

ऱ्हदयात बाळगलेल्या ज्या इच्छाआकांक्षांनी एकवेळ आयुष्याला एक उभारी दिली होती, त्या सर्व आकांक्षा फुलाच्या पाकळ्याप्रमाणे झडल्या आहेत. जिवलगांच्या दुराव्यामुळे ऱ्हदयात शूळ खुपसल्यासारख्या वेदना दिल्यात. सुखासमाधानाचे दिवस जाऊन आयुष्य वैराण झालं आहे आणि हे सर्व हताशपणे पाहण्याशिवाय दुसरं काहीच न करु शकणारे आम्ही एका बाजुला उभे राहून दूर जात असलेल्या आयुष्याच्या तांडयाने उडवलेली धूळ निष्प्राण होऊन बघत आहोत. 

आँख भी खुली न थी कि हाय धूप ढल गई 
पाँव जब तलक़ उठे कि ज़िंदगी फ़िसल गई 
पात पात झड़ गए कि शाख-शाख जल गई 
चाह तो निकल सकी न पर उमर निकल गई... 
गीत अश्क बन गए, स्वप्न हो दफ़न गए 
साथ के सभी दिये, धुआं पहन-पहन गए 
और हम झुके-झुके, मोड़ पर रुके-रुके 
उम्र की चढ़ाव का उतार देखते रहे, 
कारवाँ गुज़र... 

आयुष्याची आता कुठं सुरवात झाली होती तर संकटांचा वैशाख वणवा सहावा लागतोय. लडखडत्या पावलांनी सुरवात केली न केली तोच पायाखालची जमीनच खचलीी आहे . साऱ्या इच्छांचा पर्णसंभार या ग्रीष्मात झडुन गेलाय. उमेदीच्या आयुष्याची धुळधाण झाली आहे. ओठांवरील गीते अश्रुत भिजून गेलीत आणि निर्जीव स्वप्नांचे कलेवर निखळ विध्वंशाच्या जमिनीत गाडायचं प्राक्तन नशिबात आलंय. उन्मळून पडलेलो आम्ही आयुष्याच्या या अघटित वळणावर उभे राहून, मुठीतून गळणाऱ्या वाळुप्रमाणे आयुष्य हातातून निसटताना हतबल होऊन पाहत आहोत. 

क्या शबाब था कि फूल फूल प्यार कर उठा 
क्या कमाल था कि देख आइना सिहर उठा
 इस तरफ़ ज़मीन और आसमान उधर उठा 
थामकर जिगर उठा कि जो मिला नज़र उठा 
पर तभी मगर यहाँ  ऐसी कुछ हवा चली 
लुट गई कली कली कि घुट गई गली गली 
और हम लुटे-लुटे, वक़्त से पिटे-पिटे 
शाम की शराब का खुमार देखते रहे, कारवाँ गुज़र... 

ते ही दिवस होते जेव्हा आशांची फुले बहरून आली होती आणि त्यांची मनोरम प्रतिबिंबं मनाच्या आरशात उमटली होती. जमीनीवर राहूनही नजर क्षितिजापल्याडच्या ध्येयांवर खिळली होती, पण एकदम मग नशिबाचे फासे असे उलटले की सगळंच होत्याचं नव्हतं झालं. आयुष्याचा डाव दैवानं उधळून टाकला आणि नियतीच्या या निर्घृण फटक्याने सर्वतोपरी घायाळ होउन गेलेलो आम्ही आज आयुष्याचा संधिकाल हताशपणे पाहत आहोत.
हाथ थे मिले के ज़ुल्फ़ चाँद की सवार दूँ
होंठ थे खुले के हर बहार को पुकार लूँ 
दर्द था दिया गया के हर दुखी को प्यार दूँ 
और साँस यूँ के स्वर्ग, भूमि पर उतार दूँ 
हो सका न कुछ मगर, शाम बन गई सहर 
वो उठी लहर के ढह गये किले बिखर बिखर 
और हम डरे डरे, नीर नैन में भरे 
ओढ़ कर कफ़न पड़े मज़ार देखते रहे, कारवाँ गुज़र... 

काहीच दिवसांपूर्वी या ओठांवर बहरलेल्या ऋतुचं गाणं होतं मनात अशी इच्छा होती की आम्ही दीन दुबळ्यांच्या दुःखाने भरलेल्या जीवनावर ममतेची फुंकर घालून त्यांच्या जीवनात स्वर्ग निर्माण करू शकु, पण यातलं काहीच झालं नाही. नियतीच्या क्रूर लाटेनं हे सगळे मनोरथ वाळूच्या किल्ल्याप्रमाणे ढासळले आणि आम्ही डबडबलेल्या डोळ्यांनी व्याकुळ होऊन आमच्या आकांक्षांचे कफन ओढून पडलेलं प्रेत पाहत आहोत.

माँग भर चली के एक जब नई नई किरन 
ढोल से धुनक उठी ठुमक उठे चरण चरण 
शोर मच गया के लो चली दुल्हन चली दुल्हन 
गाँव सब उमड़ पड़ा, बहक उठे नयन नयन 
पर तभी ज़हर भरी गाज़ एक वह गिरी 
पूंछ गया सिंदूर तार तार हुई चुनरी 
और हम अजान से, दूर के मकान से
 पालकी लिये हुये कहार देखते रहे, 
कारवाँ गुज़र... 
स्वपन झड़े फूल से, मीत चुभे शूल से 
लुट गये श्र्ऋंगार सभी बाग के बबूल से और हम खड़े खड़े बहार देखते रहे कारवाँ गुज़र गया गुब्बार देखते रहे.....

आशा आकांक्षांचा सिंदूर माथ्यावर लवून आयुष्याची दुल्हन जेव्हा स्वप्नांच्या पालखीत बसून निघाली होती, तेव्हा तिला बघायला सगळं गाव लोटलं होतं. प्रत्येक नजरेत कुतुहल होतं, पण मग अशी एक विषमय लाट आली की तिच्यात माथ्यावरील सगळा सिंदूर पुसला गेला आणि वस्त्रांची लक्तरं झाली आणि आमच्या नशिबात दूरवर जाणारी ती पालखी पहायचं प्राक्तन आलं आहे.... दूरवर क्षितीज पलीकडं जाणाऱ्या,  कवेतून निसटून जात असलेल्या  आयुष्याच्या तांड्याने उडवलेली धुळ आम्ही बघंत उभे आहोत... पराभूत नजरेनं... 
कवी नीरज यांची ही गजल दिग्दर्शक आर. चंद्रा यांनी एका कवी संमेलनात ऐकली तेव्हा तिच्यातील दाहकतेनं ते भारावून गेले होते. त्यांनी ही गजल आपल्या चित्रपटात वापरण्याची परवानगी मागितली आणि नीरज यांनी ही ती उदारपणे दिली. किंबहुना या गजलेच्या अनुषंगाने संपूर्ण चित्रपटाचा डोलारा उभा केलाय म्हणाना!! 
रफीसाहेबांच्च्या आर्त आवाजात पडद्यावर हे गाणं राजीव गातो, तेव्हा विस्तीर्ण पसरलेलं, उन्हानं करपलेलं, उजाड धुळभरलं विराण माळरान, त्या माळरानावरील एखाद्या जोग्याप्रमाणं निस्संग होऊन पर्णसंभार गाळून आणि आपल्या वठलेल्या निष्पर्ण फांद्या आभाळात खुपसून त्रयस्थ पणे उभी असलेली निश्चल झाडं ही सगळी पार्श्वभूमी कवी नीरजच्या दाहक शब्दांतील विदारकता प्रखरपणे पुढं आणते. 
अर्थवाही आणि काळजात घुसणारी कवी नीरजची गीतरचना, स्वर्गीय रफीसाहेबांचा दर्दभारीत आवाज आणि रोशन यांच्या अवीट संगितानं नटलेलं हे अविस्मरणीय गाणं म्हणुनच ऐकल्यानंतर दीर्घ काळपर्यंत मनात रेंगाळत राहते. 








No comments:

Post a Comment

दूर कोई गाये धून ये सुनाये...

दूर कोई गाये धून ये सुनाये... काही चित्रपटातील संगीताला प्रेक्षकांची पसंती मिळते तर काही चित्रपटांना केवळ त्यांच्या अवीट आणि अविस्मर...