गाणं मनातलं
जीत ही लेंगे बाज़ी हम तुम,
१९६१ साली प्रदर्शित झालेल्या "शोला और शबनम" या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक रमेश सैगल हे होते. धर्मेद्र, तरला मेहता आणि अभिभट्टाचार्य यांच्या भुमिका असलेल्या या चित्रपटाचे गीतकार होते कैफी आझमी आणि त्यांच्या अर्थवाही गीतांना खय्याम यांच्या संगीताचा सुवर्णस्पर्श लाभला होता.
चित्रपटाच्या कथेत प्रेमाचा त्रिकोण आहे पण तो इतर प्रेमत्रिकोणासारखा सरळसोट नाही की ज्यात तिसरा कोन त्यागाची परिसीमा करून, प्रसंगी प्राण देऊन उरलेल्या दोघांचे मिलन सोपे करतो. ही कथा मात्र बरीच वळणं वळणं घेऊन शेवटी नायक नायिकेचे मिलन होतं. रवी याची संध्या ही बालमैत्रीण. संध्याचे वडील रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकारी तर रवीचे वडील गार्ड. रवी आणि संध्या यांची मैत्री आणि घसट सध्याच्या वडलांना पसंत नाही. काही दिवसांनी त्यांची बदली होते आणि रवी व संध्याची ताटातूट होते. पण दोघं एकमेकांना कधीही न विसरण्याच्या आणाभाका घेतात.
काळ पुढं सरकत जातो. रवी आता एक हुशार पण बेरोजगार तरूण आहे (धर्मेद्र) नोकरीसाठी खुप ठिकाणाहून नकारघंटा मिळाल्याने तो आपल्या प्रिय मित्र प्रकाशच्या ( राजन) टिंबर फॅक्टरीमध्ये काम शोधायला जातो आणि प्रकाशकडं तो मॅनेजर म्हणून कामाला लागतो. प्रकाशचा मोठा भाऊ आकाशने (अभिभट्टाचार्य) प्रकाशचे लग्न एका मुलीशी ठरवलंय आणि प्रकाश तिच्या प्रेमात आकंठ बुडलाय. ही तरूणी दुसरी तिसरी कुणी नसून आपली बालमैत्रीण संध्या (तरला मेहता) आहे हे कळल्यावर रवीवर आभाळ कोसळतं. त्याच्या मनात अजुनही तिच्या मैत्रीची आणि प्रेमाची ज्योत अविरत तेवत आहे. संध्याही पूर्वीचे प्रेम विसरली नाहीय. उध्वस्त झालेल्या रवीच्या आयुष्यात एक हादरवणारा यक्षप्रश्न दत्त म्हणून उभा ठाकतो. जिवापाड जपलेल्या प्रेमाचा स्विकार करून, ज्यानं आपल्या आयुष्याची गाडी वळणावर आणली, त्या जिवलग मित्राचा विश्वासघात करायचा की मित्राला साथ देऊन प्रेमाला तिलांजली द्यायची? हा तिढा कसा सुटतो हे सिनेमात बघण्यातंच योग्य !!
जीत ही लेंगे बाज़ी हम तुम,
खेल अधूरा छूटे ना
प्यार का बंधन,
जन्म का बंधन, जन्म का बंधन टूटे ना
मिलता है जहाँ धरती से गगन,
आओ वहीं हम जाएं
तू मेरे लिये, मैं तेरे लिये
इस दुनिया को ठुकरायें
दूर बसा ले दिल की जन्नत
जिसको ज़माना लूटे ना,
प्यार का बंधन....
वियोगामुळं आपल्या प्रेमाच्या धाग्यांची वीण सैल झाली होती आणि त्यात एक प्रकारचा अधुरेपणा आलेला होता. पण आता नवी पहाट झाली आहे. पूर्वीच्या प्रेमाच्या साक्षीनं नव्या उन्मेषशाली आयुष्याची सुरुवात करू. ह्या जन्म जन्मांतरीच्या प्रेमबंधनात आपण जखडून जाउ. आता हे प्रेमाचे धागे कधीच तूटणार नाहीत. विस्तीर्ण आणि अमर्याद आकाश जिथं धरणीला भेटतं त्या क्षितीजा पलीकडच्या इंद्रधनुषी जादुमयी स्वप्नांच्या दुनियेत आपण प्रितीचा स्वर्ग ऊभा करू. असा स्वर्ग कि जिथं या निष्ठूर जगातील विकारांची झळ लागणार नाही किंवा जिथल्या आनंदाला ग्रहण नाही.
मिलने की खुशी ना मिलने का गम,
खत्म ये झगड़े हो जाएं
तू तू ना रहे, मैं मैं ना रहूँ
इक दूजे मैं खो जाएं
मैं भी ना छोड़ूं पल भर दामन
तू भी पल भर रूठे ना, प्यार का बंधन ...
या क्षणापर्यंत बालपणाच्या स्मृतीत हरवून मंत्रमुग्ध होऊन गाणं ऐकणारी संध्या आता तिच्या नकळत त्याच्या सूरात सूर मिसळून तिच्या प्रेमाची ग्वाही देते. वियोगाचं विदीर्ण करणारं दुःख काय किंवा विरहानंतरच्या मिलनातील हर्ष काय, तिला या सगळ्यातून सुटका हवी आहे. आता तिला त्याची साथ सोडायची नाहीये. आपलं वेगवेगळं अस्तित्व विसरून दुधात साखर विरघळावी तसं एक दुसऱ्यात विरघळून जावं असं तिला वाटतंय. एका नव्या सुखद पर्वाची सुरवात करण्यासाठी.....
गीतकार कैफी आझमी यांचा प्रत्येक शब्द म्हणजे अमोल मोती आहे. प्रत्येक प्रेमी युगुलाच्या ऱ्हदयात असणाऱ्या सुखी आणि समाधानी आयुष्याची अपेक्षा आणि आकांक्षा या गीतातून व्यक्त होते. रफी आणि लताजींच्या स्वर्गीय आवाजांनी आणि खय्याम यांच्या अप्रतिम संगिताने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. विशेषतः पहिल्या कडव्यानंतरच्या इंटरल्यूड मधील पियानोवरील नोट कधी संपते आणि लताजींच्या आवाजातील गोड आलाप कधी सुरू होतो हे कळत नाही. या आलापाच्या मागोमाग येणारी हळूवार गुणगुण आपल्याला अलवारपणे "मिलने की खुशी ना मिलनेका गम" या दुसऱ्या कडव्यातील ओळीवर पोहचवते तेव्हा सूरांच्या गूढरम्य धुक्यात वेढल्याची भावना मनात साकारते. तरला मेहताच्या पारदर्शी चेहऱ्यावरील तरल भावभावनांचा अविष्कार केवळ अवर्णनीय !!
कधी मनावर निराशेच्या विचारांचं मळभ आलं असेल तर चांदण्या रात्रीच्या घुमटाखाली नीरव शांततेत हे गाणं ऐका आणि मग बघा मनाला कशी अपार शांती आणि तृप्ती मिळते...
@विनयकुलकर्णी
सिंहगड रोड पुणे


No comments:
Post a Comment