Friday, May 18, 2018

दूर कोई गाये धून ये सुनाये...



दूर कोई गाये धून ये सुनाये...

काही चित्रपटातील संगीताला प्रेक्षकांची पसंती मिळते तर काही चित्रपटांना केवळ त्यांच्या अवीट आणि अविस्मरणीय संगितामुळं ओळख अणि प्रसिद्धी मिळते. किंबहुना संगितावरच ते चित्रपट तरतात. प्रकाश पिक्चर्सच्या बॅनरखाली प्रदर्शित आणि विजय भट्ट यांचे दिग्दर्शन असलेल्या १९५२ सालचा 'बैजु बावरा' हा असाच एक चित्रपट. प्रकाश पिक्चर्सच्या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या 'प्रेमनगर' आणि 'स्टेशन मास्टर ' या चित्रपटांना नौशाद यांचं संगीत होतं आणि त्यांच्या यशस्वी संगितकार होण्यात या चित्रपटांचा मोठा वाटा होता. साहजिकच १९५२ साली बैजु बावराच्या निर्मितीच्या काळात नौशाद हे असं बडं नाव झालं होतं की त्यांच्या संगीताच्या जोरावर चित्रपट चालत. शहेनशाह, रतन आणि अनमोल घडी या चित्रपटाच्या यशस्वी संगीताची पुण्याई त्यांच्यामागं होती. संगितकारांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यात नौशाद यांचा सिंहाचा वाटा होता.

याच वेळी प्रकाश पिक्चर्स आर्थिक अडचणीत आली होती. या अडचणीतून बाहेर येण्यासाठी प्रकाश पिक्चर्सचे मालक विजय भट्ट आणि शंकर भट्ट एका हिट चित्रपटाची नितांत गरज होती. आपल्या आगामी "बैजु बावरा" या चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी विनंती करण्यासाठी ते नौशाद यांच्याकडे आले. नौशाद यांनी संगीत देण्यासाठी जी रक्कम मागितली ती भट्ट यांच्या आवाक्यातील नव्हती., पण पूर्व ऋणानुबंध स्मरून नौशाद हे अर्ध्या रकमेवर संगीत देण्यास तयार झाले.

बैजु बावरा हा असा संगीतप्रधान चित्रपट होता की ज्याचं संगीत भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित होतं. खरं सांगायचं झालं तर भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट किती चालेल या विषयी चित्रपटसृष्टीत साशंकताच होती. पण विजय भट्ट यांच्या या धाडसाला कमालीचं यश मिळालं. शास्त्रीय संगीतावर आधारीत असूनही चित्रपटातील सर्व गाणी गाजली. हिंदी चित्रपटात शास्त्रीय संगितातील रागदारीवर गाणी आणायचं श्रेय अशा रीतीने नौशाद यांना जातं.

बैजु बावरा हा बैजु आणि सम्राट अकबराच्या दरबारातील एक नवरत्न तानसेन यांच्यामधील सांगितीक द्वंदावर आधारित चित्रपट होता. बैजु हा एका संगीतज्ञाचा मुलगा. आपल्या वडिलांच्या मृत्यूला तानसेन जबाबदार आहे असं त्याला ठामपणं वाटतं. मरण्यापूर्वी वडिलांनी त्याच्याकडून तानसेनचा सूड उगवायचं वचन घेतलं. सूडाने पेटलेला लहानगा बैजु तलवार घेऊन तानसेनला मारायला निघाला असताना एका गावप्रमुखाला (मनमोहन कृष्ण) दिसतो तेव्हा तो बैजुचं मन वळवून आपल्या यमुनेच्या तीरावर वसलेल्या गावी नेतो. तिथं त्याचं एका संगीतज्ञाच्या देखरेखीखाली संगित प्रशिक्षण चालु होतं. काळाची पानं भराभर उलटतात. यौवनात पदार्पण केलेला बैजु (भारत भूषण), गावातील नावाड्याची मुलगी गौरी (मीनाकुमारी) हिच्या प्रेमात पडतो. तीही बैजुवर मनस्वी प्रेम करत असते.

चित्रपटात हे गाणं त्यावेळी येतं जेव्हा वसंत ऋतूचं आगमन झालंय. विविधरंगी मोहक फुलांचे ताटवे वातावरणाला सुगंधीत करताहेत. हा तर प्रेमिकांचा ऋतू !! प्रेमिकांच्या इंद्रधनुषी रंगीत स्वप्नभूमीत नवोन्मिलीत प्रीतीचा अविष्कार व्यक्त करण्याचे हे दिवस. गौरीच्या सख्या तिला बोलवायला आल्यात. पण गौरी त्यांच्या आनंदात सहभागी होण्याच्या मनस्थितीत नाही. बैजुच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या गौरीला त्याच्याशिवाय वसंत ऋतूचं स्वागत करायचा विचारही करवत नाही. त्याच्या विरहानं तिच्या मनाची विलक्षण घालमेल होत आहे. त्याच्या आठवणीनं वारंवार तिचे डोळे श्रावणसरींसारखे भरून येताहेत. तिच्या संख्यांना तिचं हे गुपित माहीत आहे. त्या तिला चेष्टेत हलकेच चिडवत आहेत. ते एकांतात स्वतःला दूरवर नजर हरवून बैजुच्या आठवणीत रमणं, त्याच्यासाठी उसासे टाकणं हे सगळं पाहून त्या तिला चिडवताहेत की आत्ताच हे हाल आहेत तर पुढे काय होणार? ते चिडवणं आवडत नसल्याचा आव जरी गौरी आणत असली तरी मनातून तिला गुदगुल्याच होताहेत. पण मनातील अस्वस्थता आणि घालमेल मैत्रीणींना सांगता येत नाही कारण मग त्यांच्या चेष्टांना आणखी उत येईल.
लाज आणि शरमेने तिचं मन वेढलंय, प्रियकराच्या मिलनाची आंस तर ऱ्हदयात आहे पण समाजमान्य चालीरीतींच्या शृंखला पायात गोवल्या आहेत. त्याच्या आठवणीने तिच्या ऱ्हदयात शूळ खुपसल्यासारख्या वेदना होत आहेत आणि व्याकुळ झालेले डोळे भरून यायचं काही थांबत नाहीत. तिच्या तनामनात आणि नजरेतही व्यापून उरलेल्या बैजूमुळं रात्रीची झोपही तिची वैरीण झाली आहे.

दूर कोई गाए धुन ये सुनाए
तेरे बिन छलिया रे बाजे न मुरलिया

मन के अंदर हो प्यार की अग्नि
नैना खोये-खोये कि हाय रामा नैन खोये-खोये
अभी से है ये हाल तो आगे
राम जाने क्या होए
नींद नहीं आए बिरहा सताए
तेरे बिन छलिया ...

मोरे अँगना लाज का पहरा पाँव पड़ी ज़ंजीर
कि हाय रामा पाँव पड़ी ज़ंजीर
याद किसी की जब-जब आए
लागे जीया पे तीर
के हाय रामा लगे जीया पे तीर
आँख भर आए जल बरसाए
तेरे बिन छलिया ...

प्रेमिकांच्या मनातील संभ्रमित प्रणयसुलभ संवेदना मीनाकुमारीने आपल्या अभिनयातून आणि भावोत्कट डोळ्यांतून किती समर्पकरित्या व्यक्त केल्यात. गौरीच्या मनाची गोंधळलेली घालमेल तिने आपल्या हालचालीतून सुंदरपणे सयोर आणली आहे. शकील बदायुनीने लिहिलेल्या गाण्याचा प्रत्येक शब्द म्हणजे अमोल मोती आहे. शमशाद बेगम आणि लताजींचे सादरीकरण एकमेकांना पूरक आहे. पावसाच्या एका सरीचा पाठलाग दुसर्‍या सरींनी करावा तसं ओळीमागून येणाऱ्या मधूर कोरसने गाण्याची गेयता आणि खुमारी आणखी वाढवली आहे. आणि सरतेशेवटी नौशादजींच्या संगीताबद्दल काय बोलावं? केवळ अविस्मरणीय. या चित्रपटाच्या संगितात त्यांनी पुरीया धनश्री, दरबारी, तोडी आणि देस रागांचा वापर केलाय. या चित्रपटातील "तू गंगा की मौज" या गाण्यासाठी त्यांना १९५४ सालच्या पहिल्यावहिल्या फिल्म फेअर अॅवार्डने नावाजलं गेलं यात काय नवल? नौशादजींना मिळालेलं हे एकमेव फिल्म फेअर अॅवार्ड!!

@विनय कुलकर्णी
सिंहगड रोड पुणे
















































Click here to Reply or Forward




3.63 GB (24%) of 15 GB used
Manage
Terms - Privacy
Last account activity: 7 minutes agoDetails












Thursday, May 10, 2018

सीने में जलन आँखों में तूफ़ान सा क्यों है





मुंबई!! स्वप्नांची नगरी, आणि प्रचंड विरोधाभासाचीही. इथे गगनचुंबी इमारतीच्या तळाला विस्तीर्ण पसरलेल्या झोपडपट्ट्या आहेत. आधुनिक उड्डाणपूलाखालीच बारदानावर झोपणारे गरीब मजूर आहेत. देशातील सर्वाधिक कार्यक्षम पोलीस असलेल्या या नगरीत भारतातील नामचीन खुखार गुंड आहेत इतका विरोधाभास असुनही सदैव घड्याळ्याच्या काट्यावर अविरत धावणारी ही उद्यमनगरी, देशातील इतर भागातील लोकांना एखाद्या चुंबकासारखी आकर्षित करते. दर दिवशी स्थलांतरित लोकांचे लोंढे या शहरावर आदळतात. या सर्व लोकांच्या डोळ्यात स्वप्नं असतात ती श्रीमंती आणि समृध्दीची. कष्ट केल्यास हे शहर निदान उपाशी तर ठेवत नाही हा अदम्य विश्वास उरात असतो. हा विश्वास आणि आशा मनात घेऊनच ते स्वप्नांच्या मृगजळामागे धावतात. काही मोजक्या भाग्यवंतांना ती गवसतात पण, परंतु इतर दुर्दैवी जीव मात्र उर फुटेपर्यंत धावतात तरीही ते मृगजळ त्यांच्यापासून दूरच पळतं. नियती प्रत्येकाच्या भाग्याचे पत्ते इमानाने पिसून वाटते. काहींच्या आयुष्याच्या रमीचा डाव सहजपणे लागतो, तर काहींचा रडतखडत लागतो. बऱ्याच जणांचा तर शेवटपर्यंत लागंतच नाही. असं असलं तरी हा डाव अर्धवट सोडून जाण्याचं स्वातंत्र्य नाही. दैवाचा अदृष्ट रेटा मागं असल्यानं वाट्याला आलेलं भागधेयाचं प्राक्तन स्विकारण्याखेरीज दुसरा काहीच पर्याय त्यांना उरत नाही.

१९७८ साली प्रदर्शित झालेल्या व मुझफ्फर अली दिग्दर्शित गमन या चित्रपटात अशाच गुलाम हसन (फारुख शेख) नावाच्या स्थलांतरित शेतमजुराची व्यथा मांडली आहे. उत्तर प्रदेशातील एक छोटं कोतवारा हे याचं मुळचं गाव. वडिलोपार्जित शेतजमीन गावातील थनदांडगा ठाकूर हडपतो. गावातील मिलमध्ये नोकरकपात चालू आहे. हाताला काम नाही आणि घरी आजारी आई त्याच्या बेकारीवर टोमणे मारते. बिकट परिस्थितीने त्याला पुरतं घेरलंय. त्यातल्या त्यात निदान बायको खैरून (स्मिता पाटील) ही सोशिक आहे आणि तिचा त्याला आधार आहे. मुंबईत काम करणारा लालूलाल (जलाल आगा) हा गावात येतो आणि त्याची हलाखीची परिस्थिती पाहून त्याला मुंबईत काम देण्याचं आश्वासन देतो. हताश गुलाम अखेर आईच्या व बायकोच्या विरोधाला न जुमानता गाव सोडतो. घर सोडताना बायकोच्या डबडबलेल्या अश्रूभरल्या डोळ्यात बघायचंही धाडस त्याला होत नाही. अंथरूणाची एक वळकटी आणि पत्र्याची पेटी घेऊन विषण्ण मनानं मुंबईला उतरतो. त्या क्षणापासून मुंबईत हातावर पोट ठेवून, निरंतर धावणाऱ्या काळाशी व्यर्थ स्पर्धा करत, आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अगणित स्थलांतरितांच्या लोंढ्यांतील एक क्षुद जीव होतो. काही दिवसांनी त्याला टॅक्सी ड्रायव्हरचं काम मिळतं . या भाऊगर्दीतही त्याचं संवेदनशील मन शाबूत आहे. या मोहमयी नगरातील ओसंडून वाहणारी गर्दी, ती गर्मी, डोळे दिपवणारी झगमगाटी श्रीमंती आणि तिच्या जवळच वसलेलं झोपडपट्टीचं आणि फुटपाथवरच्या गरिबांचं गलिच्छ आणि दयनीय जग हे पाहून तो अंतर्यामी अस्वस्थ होतो. आपल्या पोटात असंख्य माणसांची गर्दी कोंबून घेत धडाधडा धावणाऱ्या लोकल्स आणि त्यांच्यातील घामट गर्दीत वावरणारे भिकारी, आंधळे सूरदास आणि लोकलखाली एखादा माणुस आला तरी आता लोकल लेट होणार म्हणून चरफडणारी माणसं यांचं विषण्ण दर्शन त्याच्या मनाला चटका देतं. इथं वेळेला आणि पैशाला किंमत आहे, माणसाला नाही.

गावाकडून बायकोची पत्रं येतच असतात. आजारी आईच्या उपचारासाठी पैशाचा तगादा मागं असतो. रात्रंदिवस टॅक्सी चालवुनही फार कमाई नाही. गावाला जावून यावं म्हटलं तरी या लांबच्या प्रवासासाठी जवळ पैसे नाहीत. पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षासारखी त्याच्या हळव्या मनाची तडफड होते. शहरयार यांची समर्थ लेखणी त्याच्या या अस्वस्थ आणि बेचैन मनस्थितीचा अचुक वेध घेते. मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवताना पार्श्वभूमीवर हे गाणं सुरु होतं.....

सीने में जलन आँखों में तूफ़ान सा क्यों है
इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है

दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूँढे
पत्थर की तरह बेहिस-ओ-बेजान सा क्यों है

तनहाई की ये कौन सी मंज़िल है रफ़ीक़ों
ता-हद्द-ए-नज़र एक बयाबान सा क्यों है

क्या कोई नई बात नज़र आती है हम में
आईना हमें देख के हैरान सा क्यों है

सीने में जलन आँखों में तूफ़ान सा क्यों है
इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है


काळजात ही कसली विलक्षण अस्वस्थ करणाऱ्या जळजळीची अनुभूती आहे आणि डोळ्यात हे वादळी तूफान का भिरभिरतेय? या शहरातील प्रत्येक शापीत जीव का त्रस्त आहे?

जिवंत राहण्याचा कोणताही बहाणा शोधणारं हे ऱ्हदय आज एखाद्या निर्जीव आणि अविचलित दगडासारखं संवेदनाहीन का झालंय? काळजावर चरे ओढणाऱ्या या एकटेपणाच्या अमीट वेदनेला काही अंत आहे की नाही? या विदग्ध करणाऱ्या वेदनेची काही परिसीमा आहे की नाही? दूरदूर नजरेच्या टप्प्यात यापासून सुटका दिसत नाही. दैवाच्या क्रूर फटकाऱ्यांनी घडवलेला आमच्यातील ह्या बदलांचं प्रतिबिंब पाहून मनाचा आरसा का गोंधळला आहे?........

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नावर प्रश्न... या प्रश्नावर उत्तर नाही. या वेदनांना अंत नाही आणि त्याची कुणाला खंतही नाही. या चक्रव्यूहात शिरता येतं पण मग मागं बाहेर पडायचा मार्ग बंद होतो आणि हरत चाललेली अस्तित्वाची लढाई लढणं हेच केवळ नशिबात उरतं ...

अतिशय ज्वलंत शब्दांतून एकटेपणाची उसासी व्यक्त करणारं हे गाणं पार्श्वभूमीवर चालु असताना पडद्यावर टॅक्सी चालवणाऱ्या गुलाम हसनचा भकास आणि विदीर्ण चेहरा बघून काळजात चर् होतं हे कसलं किड्यामुंग्याचं जीणं?त्याच्या चेहऱ्यावर आतमध्ये घोंघावणाऱ्या वादळाचं सावट पाहून मन हेलावतं. मुझफ्फर अलीचा कॅमेरा टॅक्सीच्या पुढच्या काचेतून दिसणाऱ्या मुंबईच्या अनेकविध पैलूंचे भेदक दर्शन घडवतो. त्यात सिगनल्सच्या उघडझापेबरोबर अविरत वाहणारी माणसांची आणि वाहनांची गर्दी, उर फोडून ओझी ओढणारे मजूर, फुटपाथ गिळणाऱ्या झोपडपट्ट्या, त्यातील माणसांचे फुटपाथवरच चालणारे आंघोळीसारखे व्यवहार अशा अनेक विदारक गोष्टी आणि एकंदरीतच या शहराची उसवलेली सामाजिक वीण याची मनस्वी अनुभूती दिग्दर्शक देतो.

अर्थ भारीत गीतरचना, जयदेव यांचे सोपं पण मनाला भावणारं संगीत, गायक सुरेश वाडकरांचे अप्रतिम सादरीकरण या सर्वांच्या जोडीला समर्थ चित्रीकरण आणि अभिनय या सर्व घटकांची भट्टी छान जमली आहे म्हणूनच एका अविस्मरणीय गाण्याचा जन्म झालाय.

                        




गमन १९७८

कलाकार : फारुख शेख, स्मिता पाटील, जलाल आगा, गीता सिध्दार्थ, नाना पाटेकर, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे
गीतकार :शहरयार
संगीत : जयदेव
निर्माता दिग्दर्शक :मुजफ्फर अली



Tuesday, May 8, 2018

जीत ही लेंगे बाज़ी हम तुम,




गाणं मनातलं



जीत ही लेंगे बाज़ी हम तुम,

१९६१ साली प्रदर्शित झालेल्या "शोला और शबनम" या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक रमेश सैगल हे होते. धर्मेद्र, तरला मेहता आणि अभिभट्टाचार्य यांच्या भुमिका असलेल्या या चित्रपटाचे गीतकार होते कैफी आझमी आणि त्यांच्या अर्थवाही गीतांना खय्याम यांच्या संगीताचा सुवर्णस्पर्श लाभला होता.

चित्रपटाच्या कथेत प्रेमाचा त्रिकोण आहे पण तो इतर प्रेमत्रिकोणासारखा सरळसोट नाही की ज्यात तिसरा कोन त्यागाची परिसीमा करून, प्रसंगी प्राण देऊन उरलेल्या दोघांचे मिलन सोपे करतो. ही कथा  मात्र बरीच वळणं वळणं घेऊन शेवटी नायक नायिकेचे मिलन होतं. रवी याची संध्या ही बालमैत्रीण. संध्याचे वडील रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकारी तर रवीचे वडील गार्ड. रवी आणि संध्या यांची मैत्री आणि घसट सध्याच्या वडलांना पसंत नाही. काही दिवसांनी त्यांची बदली होते आणि रवी व संध्याची ताटातूट होते. पण दोघं एकमेकांना कधीही न विसरण्याच्या आणाभाका घेतात.

काळ पुढं सरकत जातो. रवी आता एक हुशार पण बेरोजगार तरूण आहे (धर्मेद्र) नोकरीसाठी खुप ठिकाणाहून नकारघंटा मिळाल्याने तो आपल्या प्रिय मित्र प्रकाशच्या ( राजन) टिंबर फॅक्टरीमध्ये काम शोधायला जातो आणि प्रकाशकडं तो मॅनेजर म्हणून कामाला लागतो. प्रकाशचा मोठा भाऊ आकाशने (अभिभट्टाचार्य) प्रकाशचे लग्न एका मुलीशी ठरवलंय आणि प्रकाश तिच्या प्रेमात आकंठ बुडलाय. ही तरूणी दुसरी तिसरी कुणी नसून आपली बालमैत्रीण संध्या (तरला मेहता) आहे हे कळल्यावर रवीवर आभाळ कोसळतं. त्याच्या मनात अजुनही तिच्या मैत्रीची आणि प्रेमाची ज्योत अविरत तेवत आहे. संध्याही पूर्वीचे प्रेम विसरली नाहीय. उध्वस्त झालेल्या रवीच्या आयुष्यात एक हादरवणारा यक्षप्रश्न दत्त म्हणून उभा ठाकतो. जिवापाड जपलेल्या प्रेमाचा स्विकार करून, ज्यानं आपल्या आयुष्याची गाडी वळणावर आणली, त्या जिवलग मित्राचा विश्वासघात करायचा की मित्राला साथ देऊन प्रेमाला तिलांजली द्यायची? हा तिढा कसा सुटतो हे सिनेमात बघण्यातंच योग्य !!

जेंव्हा संध्या विवाहापूर्वी ओळख करून घेण्यासाठी प्रकाशकडं येते तेव्हा तिची रवीशी भेट होते. रवीला तिची ओळख पटते पण आपली ओळख तो लपवून ठेवतो. प्रकाशच्या आग्रहाखातर तो हे त्यांच्या बालमैत्रीचं गाणं गात असतानाच संध्याला त्याची ओळख पटून शुध्द प्रितीचे दोन निर्झर एकमेकांना मिळतात. तिच्या नकळत तीही त्याच्या सुरांत सूर मिसळून गाते आणि एक अजरामर काव्यशिल्प आकार घेतं.

जीत ही लेंगे बाज़ी हम तुम,
खेल अधूरा छूटे ना
प्यार का बंधन,
जन्म का बंधन, जन्म का बंधन टूटे ना

मिलता है जहाँ धरती से गगन,
आओ वहीं हम जाएं
तू मेरे लिये, मैं तेरे लिये
इस दुनिया को ठुकरायें 
दूर बसा ले दिल की जन्नत
जिसको ज़माना लूटे ना,
प्यार का बंधन....

वियोगामुळं आपल्या प्रेमाच्या धाग्यांची वीण सैल झाली होती आणि त्यात एक प्रकारचा अधुरेपणा आलेला होता. पण आता नवी पहाट झाली आहे. पूर्वीच्या प्रेमाच्या साक्षीनं नव्या उन्मेषशाली आयुष्याची सुरुवात करू. ह्या जन्म जन्मांतरीच्या प्रेमबंधनात आपण जखडून जाउ. आता हे प्रेमाचे धागे कधीच तूटणार नाहीत. विस्तीर्ण आणि अमर्याद आकाश जिथं धरणीला भेटतं त्या क्षितीजा पलीकडच्या इंद्रधनुषी जादुमयी स्वप्नांच्या दुनियेत आपण प्रितीचा स्वर्ग ऊभा करू. असा स्वर्ग कि जिथं या निष्ठूर जगातील विकारांची झळ लागणार नाही किंवा जिथल्या आनंदाला ग्रहण नाही.

मिलने की खुशी ना मिलने का गम,
खत्म ये झगड़े हो जाएं
तू तू ना रहे, मैं मैं ना रहूँ
इक दूजे मैं खो जाएं
मैं भी ना छोड़ूं पल भर दामन
तू भी पल भर रूठे ना, प्यार का बंधन ...

या क्षणापर्यंत बालपणाच्या स्मृतीत हरवून मंत्रमुग्ध होऊन गाणं ऐकणारी संध्या आता तिच्या नकळत त्याच्या सूरात सूर मिसळून तिच्या प्रेमाची ग्वाही देते. वियोगाचं विदीर्ण करणारं दुःख काय किंवा विरहानंतरच्या मिलनातील हर्ष काय, तिला या सगळ्यातून सुटका हवी आहे. आता तिला त्याची साथ सोडायची नाहीये. आपलं वेगवेगळं अस्तित्व विसरून दुधात साखर विरघळावी तसं एक दुसऱ्यात विरघळून जावं असं तिला वाटतंय. एका नव्या सुखद पर्वाची सुरवात करण्यासाठी.....

गीतकार कैफी आझमी यांचा प्रत्येक शब्द म्हणजे अमोल मोती आहे. प्रत्येक  प्रेमी युगुलाच्या ऱ्हदयात असणाऱ्या सुखी आणि समाधानी आयुष्याची अपेक्षा आणि आकांक्षा या गीतातून व्यक्त होते. रफी आणि लताजींच्या स्वर्गीय आवाजांनी आणि खय्याम यांच्या अप्रतिम संगिताने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. विशेषतः पहिल्या कडव्यानंतरच्या इंटरल्यूड मधील पियानोवरील नोट कधी संपते आणि लताजींच्या आवाजातील गोड आलाप कधी सुरू होतो हे कळत नाही. या आलापाच्या मागोमाग येणारी हळूवार गुणगुण आपल्याला अलवारपणे "मिलने की खुशी ना मिलनेका गम" या दुसऱ्या कडव्यातील ओळीवर पोहचवते तेव्हा सूरांच्या गूढरम्य धुक्यात वेढल्याची भावना मनात साकारते. तरला मेहताच्या पारदर्शी चेहऱ्यावरील तरल भावभावनांचा अविष्कार केवळ अवर्णनीय !!

कधी मनावर निराशेच्या विचारांचं मळभ आलं असेल तर चांदण्या रात्रीच्या घुमटाखाली नीरव शांततेत हे गाणं ऐका आणि मग बघा मनाला कशी अपार शांती आणि तृप्ती मिळते...


@विनयकुलकर्णी
सिंहगड रोड पुणे



Thursday, May 3, 2018

तुमसें दूर चले हम मजबूर चले




तुमसें दूर चले हम मजबूर चले

काही गाणी मनात आनंदाचा शिडकावा करून जातात तर काही मनाला हुरहुर लावतात. काही गाणी दुःख्खी व विरही असली तरीही मनाला स्पर्श करून जातात, कारण नाही म्हटले तरी दुःख्ख हाच मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे नाही का? भावना कुठल्याही असोत, ज्या गाण्याचे शब्द अर्थवाही असतात, ज्या गाण्यात सुर आणि स्वर यांचा विहंगम मेळ जुळून येतो, ते गाणे मनाचे भावविश्व व्यापून टाकते. मला नितांत आवडणारे हे गाणे आहे प्यार की राहें या १९५९ सालच्या सिनेमातील हेमंतदा आणि लताजींचे, कनु घोष या काहीशा अनोळखी संगीतकाराचे आहे. गीतरचना आहे प्रेम धवन यांची.
प्रेमात आकंठ बुडालेल्या पण परिस्थितीवश प्रेम साफल्य न होऊ शकणाऱ्या एका प्रेमी युगुलाचे मूक आक्रंदन या गाण्यात प्रतिबिंबित होते. इतर विरही गाण्याच्या मानाने ही चाल काहीशी जलद वाटली तरी गाण्यातील भावना सुंदरपणे व्यक्त करते.
सुरवातीच्या व्हायोलिन्स व तबल्याचा स्वरमेळ गाण्याची गती आणि ठेका निश्चित करतो आणि मग हेमंतदाच्या पौरूषेय आणि घनगंभीर आवाजाने गाणे सुरू होते.
तुमसें दूर हुए, हम मजबूर हुए
प्यार भरे दिल मिल ना सके
नील गगन के तले, नील गगन के तले,
पहिले कडवे लताजींच्या आर्त स्वरात आहे....


ना तेरी खता ना मेरी खता

ये है किस्मत के खेल
तुम भी चाहो हम भी चाहे
हो न सके पर मेल
तुमसे दूर हुई, मै मजबूर हुई
रूठी हुई तकदीर के आगे
किसका जोर चले, किसका जोर चले.

अगदी हताश तुझ्यापासून मी दूर जाते आहे पण यात तुझाही दोष नाही आणि माझाही नाही. नशिबंच रुसले आहे तेथे कोण काय करेल... या ओळींतून दोघा प्रेमिकांची दैव शरणता अधोरेखित होते.
किसका जोर चले या ओळीतील "चले" या शब्दावर लताजींनी दिलेला हलकासा हेलकावा जीवघेणा....
सुख चैन गया अरमाॅं लुटे इस प्यार की राहोंमें
वो प्रीत मेरी वो गीत मेरे ढल गये आहोंमें
तुम बीन रह ना सकु पर कुछ कह ना सकु
लोक लाजके घुंगटमें, रो रो कोई जले
रो रो कोई जले

आयुष्यातील ते सुखाचे क्षण, ती प्रेमगीते या सर्वांची परिणिती आता केवळ विरही, दुःखभऱ्या क्षणात झाली आहे. तुझा विरह साहवत नाही आणि ही मनाची घुसमट लोकलाजेस्तव कुणाला सांगुही शकत नाही. आता केवळ विदग्ध होऊन जगणे....
आशयघन शब्दरचना, हेमंतदा आणि लताजींचा दिव्य आवाज, कमीत कमी वाद्यमेळ आणि कनु घोष यांचे सुंदर संगीत या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते,म्हणुनच संपल्यावर ही आपल्या मनात हे गाणं रुंजी घालत राहते.
@विनय कुलकर्णी
पुणे






स्वप्न झड़े फूल से, मीत चुभे शूल से




सभोवतालची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बिघडत असेल आणि नैतिक मुल्यांची अवनती होत असेल, तर महाविद्यालयीन युवकांचे कर्तव्य काय असावं ? आपले शिक्षण प्रथम व्यवस्थित पार करुन देशाचे सुशिक्षित नागरीक होऊन मग राजकारणात सक्रिय व्हावे की राष्ट्र उमारणीसाठी शिक्षणाला तिलांजली देवून राजकारणात यावं? 
प्रत्येक देशाभिमानी विद्यार्थी युवकाला भेडसावणाऱ्या या विषयाला हात घालणारा चित्रपट १९६५ साली प्रदर्शित झाला. नांव होतं " नयी उमर की नयी फसल". आर. चंद्रा दिग्दर्शित, या चित्रपटाची गीते कवी नीरज यांनी शब्दबद्ध केली असून या गीतांना रोशन यांच्या संगीताचा परीसस्पर्श लाभला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला ते साल होतं १९६५, म्हणजे देश स्वतंत्र होऊन तब्बल १७ वर्षे पूर्ण झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तत्कालीन तरूण आणि विद्यार्थी युवकाच्या ओठावर राष्ट्रगान होते. डोळ्यात स्वप्नांची इंद्रधनुष्ये आणि ऱ्हदयातील आकांक्षांना गवसणी घालायची आंस होती. हातांना कामाची अपेक्षा होती आणि आणि मनाला समृध्दीची प्रतिक्षा होती. 
पण जसजशी वर्षे पुढे सरकत गेली तशी या स्वप्नांच्या कळ्या झडून गेल्या. राजकारणात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. बेरोजगार तरूणांचे तांडे अस्वस्थ झाले आणि मग नाईलाजाने हिंसाचाराकडं वळले. त्यांना वाममार्गाला लावण्यासाठी बाहेरच्या अनिष्ट शक्ती तयार होत्याच... 
नयी उमर की नयी फसल या चित्रपटात अशाच राजीव नामक युवकाची आणि त्याच्या मित्रांची कथा सांगितली आहे. राजीव ( राजीव) हा एका महाविद्यालयात शिक्षण घेणारा तडफदार पण उतावीळ आणि भडक स्वभावाचा पण अंतर्यामी सृजनशील व कवी मनाचा युवक आहे. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची देशात चाललेली वाताहत पाहून तो व त्याचे काॅलेजमधील मित्र यांच्या मनात व्यवस्थेविषयी अंगार आहे. तशातच देशात निवडणुकीचे वारे वाहताहेत. राजीव व त्याचे मित्र शिक्षण सोडून राजकारणात सक्रिय होऊन देशातील ही विपरीत व्यवस्था आमुलाग्र बदलायच्या ध्यासाने झपाटून जातात. त्याची काॅलेजमधील प्रेयसी शैल (तनुजा) हीचा मात्र या साऱ्या गोष्टींना विरोध आहे. सरस्वतीच्या मंदिरात शक्तिची पूजा नको. तरूणाईने आधी आपलं शिक्षण पूर्ण करून, बौध्दिक दृष्ट्या प्रगल्भ होउन मग विधायक राजकारणात जाऊन हवी तर देशसेवा करावी असं तिचं मत आहे. देशभक्ती म्हणजे केवळ राजकारण नव्हे, इतरही अनेक विधायक मार्गांनी मातृभूमीचे ऋण उतरवता येतं पण त्यासाठी शुध्द चारित्र्य आणि प्रगाढ अभ्यासाची गरज आहे आणि हे सर्व शिक्षणानंच मिळतं म्हणून राजीवनं शिक्षणाकडं लक्ष द्यावं असं तिचं मत आहे. राजीवचा भाऊ आणि त्याची आई हे ही तिच्याशी सहमत आहेत. पण या सर्वांचा विरोध झुगारून राजीव आणि त्याचे मित्र राजकारणात शिरून एक पक्ष निर्माण करतात आणि निवडणूक लढवायचे ठरवतात. त्यांना फूस देण्यासाठी आणि या फुकट उपलब्ध असलेल्या युवाशक्तीचा आपल्या पक्षासाठी उपयोग करून घेण्यासाठी इतर पक्ष आणि धंदेवाईक प्रवृत्ती तयारच असतात. ते राजीवलाच निवडणूक लढण्यासाठी उद्युक्त करतात. निवडणूक म्हटले की पैसा आलाच. त्याची चणचण जाणवु लागताच राजीव आईने कष्टाने जमवलेले पैसे आणि दागिन्यांची चोरी करतो. निवडणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचारात राजीव आणि त्याचे मित्र जखमी होतात. कालेज प्रिंसीपल त्यांना रस्टिकेट करतात. या निर्णयामुळे चिडलेले ते संप करतात. या सर्व प्रकरणात राजीवला मनस्वी त्रास होतो. घरातली माणसं, आई आणि भाऊ दूरावतात व तो घर सोडतो. प्रेयसीही दुरावते. राजीवची आई राजीवने चोरी केली या धसक्याने आजारी पडून अंथरुणाला खिळते. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने शैलकडून पैसे घ्यायची नामुष्की घरावर येते. पैशापरी पैसा जातो, घर सोडायची पाळी येते, प्रिय माणसांची नाराजी व त्यांचा वियोग सहन करावा लागतो, काॅलेज मध्ये दुष्किर्ती होते. इतकं करून राजीवच्या हाती काय येतं तर निवडणुकीतील अपयशाचे दारूण प्राक्तन..!! सगळंच आयुष्य नासलेल्या दुधासारखं होतं. 
या विदारक परिस्थितीत होरपळून गेलेला आणि पश्चातापदग्ध झालेला राजीव या गीताद्वारे आपल्या विदग्ध मनातले विचार व्यक्त करतो.
स्वप्न झड़े फूल से, मीत चुभे शूल से 
लुट गये श्र्ऋंगार सभी, बाग के बबूल से 
और हम खड़े खड़े, बहार देखते रहे 
कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे …..

ऱ्हदयात बाळगलेल्या ज्या इच्छाआकांक्षांनी एकवेळ आयुष्याला एक उभारी दिली होती, त्या सर्व आकांक्षा फुलाच्या पाकळ्याप्रमाणे झडल्या आहेत. जिवलगांच्या दुराव्यामुळे ऱ्हदयात शूळ खुपसल्यासारख्या वेदना दिल्यात. सुखासमाधानाचे दिवस जाऊन आयुष्य वैराण झालं आहे आणि हे सर्व हताशपणे पाहण्याशिवाय दुसरं काहीच न करु शकणारे आम्ही एका बाजुला उभे राहून दूर जात असलेल्या आयुष्याच्या तांडयाने उडवलेली धूळ निष्प्राण होऊन बघत आहोत. 

आँख भी खुली न थी कि हाय धूप ढल गई 
पाँव जब तलक़ उठे कि ज़िंदगी फ़िसल गई 
पात पात झड़ गए कि शाख-शाख जल गई 
चाह तो निकल सकी न पर उमर निकल गई... 
गीत अश्क बन गए, स्वप्न हो दफ़न गए 
साथ के सभी दिये, धुआं पहन-पहन गए 
और हम झुके-झुके, मोड़ पर रुके-रुके 
उम्र की चढ़ाव का उतार देखते रहे, 
कारवाँ गुज़र... 

आयुष्याची आता कुठं सुरवात झाली होती तर संकटांचा वैशाख वणवा सहावा लागतोय. लडखडत्या पावलांनी सुरवात केली न केली तोच पायाखालची जमीनच खचलीी आहे . साऱ्या इच्छांचा पर्णसंभार या ग्रीष्मात झडुन गेलाय. उमेदीच्या आयुष्याची धुळधाण झाली आहे. ओठांवरील गीते अश्रुत भिजून गेलीत आणि निर्जीव स्वप्नांचे कलेवर निखळ विध्वंशाच्या जमिनीत गाडायचं प्राक्तन नशिबात आलंय. उन्मळून पडलेलो आम्ही आयुष्याच्या या अघटित वळणावर उभे राहून, मुठीतून गळणाऱ्या वाळुप्रमाणे आयुष्य हातातून निसटताना हतबल होऊन पाहत आहोत. 

क्या शबाब था कि फूल फूल प्यार कर उठा 
क्या कमाल था कि देख आइना सिहर उठा
 इस तरफ़ ज़मीन और आसमान उधर उठा 
थामकर जिगर उठा कि जो मिला नज़र उठा 
पर तभी मगर यहाँ  ऐसी कुछ हवा चली 
लुट गई कली कली कि घुट गई गली गली 
और हम लुटे-लुटे, वक़्त से पिटे-पिटे 
शाम की शराब का खुमार देखते रहे, कारवाँ गुज़र... 

ते ही दिवस होते जेव्हा आशांची फुले बहरून आली होती आणि त्यांची मनोरम प्रतिबिंबं मनाच्या आरशात उमटली होती. जमीनीवर राहूनही नजर क्षितिजापल्याडच्या ध्येयांवर खिळली होती, पण एकदम मग नशिबाचे फासे असे उलटले की सगळंच होत्याचं नव्हतं झालं. आयुष्याचा डाव दैवानं उधळून टाकला आणि नियतीच्या या निर्घृण फटक्याने सर्वतोपरी घायाळ होउन गेलेलो आम्ही आज आयुष्याचा संधिकाल हताशपणे पाहत आहोत.
हाथ थे मिले के ज़ुल्फ़ चाँद की सवार दूँ
होंठ थे खुले के हर बहार को पुकार लूँ 
दर्द था दिया गया के हर दुखी को प्यार दूँ 
और साँस यूँ के स्वर्ग, भूमि पर उतार दूँ 
हो सका न कुछ मगर, शाम बन गई सहर 
वो उठी लहर के ढह गये किले बिखर बिखर 
और हम डरे डरे, नीर नैन में भरे 
ओढ़ कर कफ़न पड़े मज़ार देखते रहे, कारवाँ गुज़र... 

काहीच दिवसांपूर्वी या ओठांवर बहरलेल्या ऋतुचं गाणं होतं मनात अशी इच्छा होती की आम्ही दीन दुबळ्यांच्या दुःखाने भरलेल्या जीवनावर ममतेची फुंकर घालून त्यांच्या जीवनात स्वर्ग निर्माण करू शकु, पण यातलं काहीच झालं नाही. नियतीच्या क्रूर लाटेनं हे सगळे मनोरथ वाळूच्या किल्ल्याप्रमाणे ढासळले आणि आम्ही डबडबलेल्या डोळ्यांनी व्याकुळ होऊन आमच्या आकांक्षांचे कफन ओढून पडलेलं प्रेत पाहत आहोत.

माँग भर चली के एक जब नई नई किरन 
ढोल से धुनक उठी ठुमक उठे चरण चरण 
शोर मच गया के लो चली दुल्हन चली दुल्हन 
गाँव सब उमड़ पड़ा, बहक उठे नयन नयन 
पर तभी ज़हर भरी गाज़ एक वह गिरी 
पूंछ गया सिंदूर तार तार हुई चुनरी 
और हम अजान से, दूर के मकान से
 पालकी लिये हुये कहार देखते रहे, 
कारवाँ गुज़र... 
स्वपन झड़े फूल से, मीत चुभे शूल से 
लुट गये श्र्ऋंगार सभी बाग के बबूल से और हम खड़े खड़े बहार देखते रहे कारवाँ गुज़र गया गुब्बार देखते रहे.....

आशा आकांक्षांचा सिंदूर माथ्यावर लवून आयुष्याची दुल्हन जेव्हा स्वप्नांच्या पालखीत बसून निघाली होती, तेव्हा तिला बघायला सगळं गाव लोटलं होतं. प्रत्येक नजरेत कुतुहल होतं, पण मग अशी एक विषमय लाट आली की तिच्यात माथ्यावरील सगळा सिंदूर पुसला गेला आणि वस्त्रांची लक्तरं झाली आणि आमच्या नशिबात दूरवर जाणारी ती पालखी पहायचं प्राक्तन आलं आहे.... दूरवर क्षितीज पलीकडं जाणाऱ्या,  कवेतून निसटून जात असलेल्या  आयुष्याच्या तांड्याने उडवलेली धुळ आम्ही बघंत उभे आहोत... पराभूत नजरेनं... 
कवी नीरज यांची ही गजल दिग्दर्शक आर. चंद्रा यांनी एका कवी संमेलनात ऐकली तेव्हा तिच्यातील दाहकतेनं ते भारावून गेले होते. त्यांनी ही गजल आपल्या चित्रपटात वापरण्याची परवानगी मागितली आणि नीरज यांनी ही ती उदारपणे दिली. किंबहुना या गजलेच्या अनुषंगाने संपूर्ण चित्रपटाचा डोलारा उभा केलाय म्हणाना!! 
रफीसाहेबांच्च्या आर्त आवाजात पडद्यावर हे गाणं राजीव गातो, तेव्हा विस्तीर्ण पसरलेलं, उन्हानं करपलेलं, उजाड धुळभरलं विराण माळरान, त्या माळरानावरील एखाद्या जोग्याप्रमाणं निस्संग होऊन पर्णसंभार गाळून आणि आपल्या वठलेल्या निष्पर्ण फांद्या आभाळात खुपसून त्रयस्थ पणे उभी असलेली निश्चल झाडं ही सगळी पार्श्वभूमी कवी नीरजच्या दाहक शब्दांतील विदारकता प्रखरपणे पुढं आणते. 
अर्थवाही आणि काळजात घुसणारी कवी नीरजची गीतरचना, स्वर्गीय रफीसाहेबांचा दर्दभारीत आवाज आणि रोशन यांच्या अवीट संगितानं नटलेलं हे अविस्मरणीय गाणं म्हणुनच ऐकल्यानंतर दीर्घ काळपर्यंत मनात रेंगाळत राहते. 








सपना बन साजन आये...

सपना बन साजन आये...





निर्माता आणि निर्देशक केदार शर्मा यांनी दोन असामान्य प्रतिभेचे संगितकार हिंदी चित्रपटसृषटीला दिले. 1950 साली प्रदर्शित झालेल्या बावरे नैन मध्ये त्यांनी संगीतकार रोशन यांना संधी दिली. या चित्रपटाचे संगीत गाजले आणि प्रेक्षकांनी पण त्यांच्या संगीतावर पसंतीची मोहर उठवली. रोशन यांची संगीत कारकीर्द यानंतर बहरली आणि त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. केदार शर्मा यांनी दिलेले दुसरे संगीतकार म्हणजे स्नेहल भाटकर जे त्यांच्या दर्जेदार संगीताबद्दल जाणकार रसिकांना माहीत आहेत.
या दोन संगितकारांशिवय आणखी एका गुणी आणि प्रतिभावान संगितकाराला पुढे आणण्याचे श्रेय केदार शर्मा यांना जाते. हा संगीतकार म्हणजे जमाल सेन..
आपल्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत जमाल सेन यांनी उण्यापुऱ्या १४ हिंदी चित्रपटांना संगीत दिले. राजस्थान मध्ये जन्मलेल्या जमाल सेन यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे तिथेच व्यतित झाल्यामुळे त्यांच्या संगीताला राजस्थानी ग्रामीण संगीताचा सुगंध होता. मुंबईत आल्यावर संगीताची जाण असलेल्या केदार शर्मा यांच्या नजरेत ते भरले नसते तरंच नवल .!! ते साल होतं १९५१. दोन वर्षांपूर्वी रोशन यांना ब्रेक देणाऱ्या केदार शर्मा यांच्या आगामी शोखिया चित्रपटाची कथा आदिवासी समाज आणि प्रस्थापितांविरुद्ध त्यांचा संघर्ष यांच्यावर  बेतली होती. जमाल सेन यांची आदिवासी आणि ग्रामीण संगीताची जाण माहीत असल्याने शर्मा यांनी त्यांच्या नेहमीच्या रोशन आणि भाटकर या संगितकारांना वगळून जमाल सेन यांना या चित्रपटाचे संगीत देण्याची संधी दिली. जमाल सेन यांनीही केदार शर्मा यांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. विशेषतः या चित्रपटातील लताजींनी गायलेले "सपना बन साजन आये" आणि अभिनेत्री - गायिका सुरैय्या यांचे "रातोंकी नींद छिन ली" ही गाणी अतिशय मधूर आणि मर्मस्पर्शी होती. जमाल सेन यांचे शोखीया आणि दायरा या चित्रपटांचे संगीत दर्जेदार होते. दुर्दैवाने ही यशोगाथा त्यांना पुढे चालू  ठेवण्यात यश आले नाही. अपयशामुळे निराश झालेल्या जमाल सेन यांचा एकाकी अवस्थेत १२ एप्रिल १९७९ मध्ये दुर्दैवी अंत झाला.
शोखियाॅ या १९५१ सालच्या चित्रपटातील "सपना बन साजन आये" हे लताजींच्या आवाजातील नितांत सुंदर गाणं जरी पडद्यावर आदिवासी राणीच्या तोंडी असले तरी गाण्यातील शब्दांतून व्यक्त झालेल्या भावनांचा मनोरम अविष्कार राणीच्या मागे चवरी आढळणाऱ्या सुरैय्याच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. एका दृष्टीने हे गाणं तिचेच भावविश्व व्यक्त करते.

सोयी कलियाँ हँस पड़ी
झुके लाज से नैन
वीना की झंकार में
तड़पन लागे बैन
सपना बन साजन आये
हम देख देख मुसकाये
ये नैना भर आये, शरमाये
सपना बन साजन आये..

ऱ्हदयातील  प्रीतीच्या निद्रिस्त कळ्यांना  आता जाग आली आहे.  अर्धोन्मीलित नेत्र लज्जेने जड होऊन झुकले आहेत. वीणेच्या अस्वस्थ करणाऱ्या झंकारामुळे  विदग्ध झालेले मन प्रियकराच्या विरहाग्नीत तळमळतंय. अशातंच एक विहंगम स्वप्न बनून प्रियकर येतो. त्याच्या येण्याने पावसाळी नेत्रांत लज्जा उतरली आहे आणि ऱ्हदयात हर्षभरीत हास्य... सुखाचे व समाधानाचे !!

बिछ गये बादल बन कर चादर
इन्द्रधनुष पे हमने जाकर
झूले ख़ूब झुलाये
ये नैना भर आये, शरमाये
सपना बन साजन आये

स्वप्नात प्रियकराच्या सहवासात  आकाशातील ढगांच्या गालीच्यावर  पसरून इंद्रधनुष्याच्या झुल्यावर तिचे मन  मनसोक्त हिंदोळे घेतंय.

नील गगन के सुंदर तारे
चुन लिये फूल समझ अति न्यारे
झोली में भर लाये
ये नैना भर आये, शरमाये
सपना बन साजन आये

लाख चांदण्यांची  गडद निळी मखमाली रात्र  हळूहळू हलकेच मदीर होत चाललीय. अशा वेळी रात्रीच्या त्या अमर्याद प्राकारात उमललेली नक्षत्रफुले  वेचून ती नक्षत्रखचित झोळी त्याला अर्पण करावी असं तिला वाटतंय. पण लज्जा आडवी येत आहे आणि डोळ्यात अश्रू दाटलेत.पाहिलं तर हे निसर्ग चित्र किती सुंदर वाटतं ना? शुभ्र फुलांनी बहरलेल्या  चेरीच्या वृक्षाप्रमाणं.....
स्त पवन थी, हम थे अकेले
हिलमिल कर बरखा संग खेले
फूले नहीं समाये, हम फूले नहीं समाये
ये नैना भर आये, शरमाये
सपना बन साजन आये …

शीतल पावसाळी वाऱ्यावर लहरत येणाऱ्या पावसाच्या अविरत सरीबरोंबर बेधुंद होउन मुक्तपणे खेळताना तिच्या ऱ्हदयात आनंद मावेनासा झालाय... एक सुंदर स्वप्न बनून प्रियकर येतोय...
या गाण्याची दिना नाथ मधोक  यांची शब्दरचना अतिशय आशयघन आणि अर्थवाही आहे. लताजींच्या कोवळ्या आणि मधाळ आवाजातील  यमन कल्याण रागात बांधलेले हे गाणे हळुवार आलापांनी शांतपणे सुरू होते व हळुहळु बहरत जात ऐकणाऱ्याला वेगळ्याच स्वप्नील विश्वात घेऊन जाते आणि म्हणूनच संपल्यावरही मनात रुतून बसते...

@ विनय कुलकर्णी
सिंहगड रोड पुणे


दूर कोई गाये धून ये सुनाये...

दूर कोई गाये धून ये सुनाये... काही चित्रपटातील संगीताला प्रेक्षकांची पसंती मिळते तर काही चित्रपटांना केवळ त्यांच्या अवीट आणि अविस्मर...