Friday, May 18, 2018

दूर कोई गाये धून ये सुनाये...



दूर कोई गाये धून ये सुनाये...

काही चित्रपटातील संगीताला प्रेक्षकांची पसंती मिळते तर काही चित्रपटांना केवळ त्यांच्या अवीट आणि अविस्मरणीय संगितामुळं ओळख अणि प्रसिद्धी मिळते. किंबहुना संगितावरच ते चित्रपट तरतात. प्रकाश पिक्चर्सच्या बॅनरखाली प्रदर्शित आणि विजय भट्ट यांचे दिग्दर्शन असलेल्या १९५२ सालचा 'बैजु बावरा' हा असाच एक चित्रपट. प्रकाश पिक्चर्सच्या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या 'प्रेमनगर' आणि 'स्टेशन मास्टर ' या चित्रपटांना नौशाद यांचं संगीत होतं आणि त्यांच्या यशस्वी संगितकार होण्यात या चित्रपटांचा मोठा वाटा होता. साहजिकच १९५२ साली बैजु बावराच्या निर्मितीच्या काळात नौशाद हे असं बडं नाव झालं होतं की त्यांच्या संगीताच्या जोरावर चित्रपट चालत. शहेनशाह, रतन आणि अनमोल घडी या चित्रपटाच्या यशस्वी संगीताची पुण्याई त्यांच्यामागं होती. संगितकारांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यात नौशाद यांचा सिंहाचा वाटा होता.

याच वेळी प्रकाश पिक्चर्स आर्थिक अडचणीत आली होती. या अडचणीतून बाहेर येण्यासाठी प्रकाश पिक्चर्सचे मालक विजय भट्ट आणि शंकर भट्ट एका हिट चित्रपटाची नितांत गरज होती. आपल्या आगामी "बैजु बावरा" या चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी विनंती करण्यासाठी ते नौशाद यांच्याकडे आले. नौशाद यांनी संगीत देण्यासाठी जी रक्कम मागितली ती भट्ट यांच्या आवाक्यातील नव्हती., पण पूर्व ऋणानुबंध स्मरून नौशाद हे अर्ध्या रकमेवर संगीत देण्यास तयार झाले.

बैजु बावरा हा असा संगीतप्रधान चित्रपट होता की ज्याचं संगीत भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित होतं. खरं सांगायचं झालं तर भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट किती चालेल या विषयी चित्रपटसृष्टीत साशंकताच होती. पण विजय भट्ट यांच्या या धाडसाला कमालीचं यश मिळालं. शास्त्रीय संगीतावर आधारीत असूनही चित्रपटातील सर्व गाणी गाजली. हिंदी चित्रपटात शास्त्रीय संगितातील रागदारीवर गाणी आणायचं श्रेय अशा रीतीने नौशाद यांना जातं.

बैजु बावरा हा बैजु आणि सम्राट अकबराच्या दरबारातील एक नवरत्न तानसेन यांच्यामधील सांगितीक द्वंदावर आधारित चित्रपट होता. बैजु हा एका संगीतज्ञाचा मुलगा. आपल्या वडिलांच्या मृत्यूला तानसेन जबाबदार आहे असं त्याला ठामपणं वाटतं. मरण्यापूर्वी वडिलांनी त्याच्याकडून तानसेनचा सूड उगवायचं वचन घेतलं. सूडाने पेटलेला लहानगा बैजु तलवार घेऊन तानसेनला मारायला निघाला असताना एका गावप्रमुखाला (मनमोहन कृष्ण) दिसतो तेव्हा तो बैजुचं मन वळवून आपल्या यमुनेच्या तीरावर वसलेल्या गावी नेतो. तिथं त्याचं एका संगीतज्ञाच्या देखरेखीखाली संगित प्रशिक्षण चालु होतं. काळाची पानं भराभर उलटतात. यौवनात पदार्पण केलेला बैजु (भारत भूषण), गावातील नावाड्याची मुलगी गौरी (मीनाकुमारी) हिच्या प्रेमात पडतो. तीही बैजुवर मनस्वी प्रेम करत असते.

चित्रपटात हे गाणं त्यावेळी येतं जेव्हा वसंत ऋतूचं आगमन झालंय. विविधरंगी मोहक फुलांचे ताटवे वातावरणाला सुगंधीत करताहेत. हा तर प्रेमिकांचा ऋतू !! प्रेमिकांच्या इंद्रधनुषी रंगीत स्वप्नभूमीत नवोन्मिलीत प्रीतीचा अविष्कार व्यक्त करण्याचे हे दिवस. गौरीच्या सख्या तिला बोलवायला आल्यात. पण गौरी त्यांच्या आनंदात सहभागी होण्याच्या मनस्थितीत नाही. बैजुच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या गौरीला त्याच्याशिवाय वसंत ऋतूचं स्वागत करायचा विचारही करवत नाही. त्याच्या विरहानं तिच्या मनाची विलक्षण घालमेल होत आहे. त्याच्या आठवणीनं वारंवार तिचे डोळे श्रावणसरींसारखे भरून येताहेत. तिच्या संख्यांना तिचं हे गुपित माहीत आहे. त्या तिला चेष्टेत हलकेच चिडवत आहेत. ते एकांतात स्वतःला दूरवर नजर हरवून बैजुच्या आठवणीत रमणं, त्याच्यासाठी उसासे टाकणं हे सगळं पाहून त्या तिला चिडवताहेत की आत्ताच हे हाल आहेत तर पुढे काय होणार? ते चिडवणं आवडत नसल्याचा आव जरी गौरी आणत असली तरी मनातून तिला गुदगुल्याच होताहेत. पण मनातील अस्वस्थता आणि घालमेल मैत्रीणींना सांगता येत नाही कारण मग त्यांच्या चेष्टांना आणखी उत येईल.
लाज आणि शरमेने तिचं मन वेढलंय, प्रियकराच्या मिलनाची आंस तर ऱ्हदयात आहे पण समाजमान्य चालीरीतींच्या शृंखला पायात गोवल्या आहेत. त्याच्या आठवणीने तिच्या ऱ्हदयात शूळ खुपसल्यासारख्या वेदना होत आहेत आणि व्याकुळ झालेले डोळे भरून यायचं काही थांबत नाहीत. तिच्या तनामनात आणि नजरेतही व्यापून उरलेल्या बैजूमुळं रात्रीची झोपही तिची वैरीण झाली आहे.

दूर कोई गाए धुन ये सुनाए
तेरे बिन छलिया रे बाजे न मुरलिया

मन के अंदर हो प्यार की अग्नि
नैना खोये-खोये कि हाय रामा नैन खोये-खोये
अभी से है ये हाल तो आगे
राम जाने क्या होए
नींद नहीं आए बिरहा सताए
तेरे बिन छलिया ...

मोरे अँगना लाज का पहरा पाँव पड़ी ज़ंजीर
कि हाय रामा पाँव पड़ी ज़ंजीर
याद किसी की जब-जब आए
लागे जीया पे तीर
के हाय रामा लगे जीया पे तीर
आँख भर आए जल बरसाए
तेरे बिन छलिया ...

प्रेमिकांच्या मनातील संभ्रमित प्रणयसुलभ संवेदना मीनाकुमारीने आपल्या अभिनयातून आणि भावोत्कट डोळ्यांतून किती समर्पकरित्या व्यक्त केल्यात. गौरीच्या मनाची गोंधळलेली घालमेल तिने आपल्या हालचालीतून सुंदरपणे सयोर आणली आहे. शकील बदायुनीने लिहिलेल्या गाण्याचा प्रत्येक शब्द म्हणजे अमोल मोती आहे. शमशाद बेगम आणि लताजींचे सादरीकरण एकमेकांना पूरक आहे. पावसाच्या एका सरीचा पाठलाग दुसर्‍या सरींनी करावा तसं ओळीमागून येणाऱ्या मधूर कोरसने गाण्याची गेयता आणि खुमारी आणखी वाढवली आहे. आणि सरतेशेवटी नौशादजींच्या संगीताबद्दल काय बोलावं? केवळ अविस्मरणीय. या चित्रपटाच्या संगितात त्यांनी पुरीया धनश्री, दरबारी, तोडी आणि देस रागांचा वापर केलाय. या चित्रपटातील "तू गंगा की मौज" या गाण्यासाठी त्यांना १९५४ सालच्या पहिल्यावहिल्या फिल्म फेअर अॅवार्डने नावाजलं गेलं यात काय नवल? नौशादजींना मिळालेलं हे एकमेव फिल्म फेअर अॅवार्ड!!

@विनय कुलकर्णी
सिंहगड रोड पुणे
















































Click here to Reply or Forward




3.63 GB (24%) of 15 GB used
Manage
Terms - Privacy
Last account activity: 7 minutes agoDetails












No comments:

Post a Comment

दूर कोई गाये धून ये सुनाये...

दूर कोई गाये धून ये सुनाये... काही चित्रपटातील संगीताला प्रेक्षकांची पसंती मिळते तर काही चित्रपटांना केवळ त्यांच्या अवीट आणि अविस्मर...